सध्या तापमानाचा पारा वाढत आहे, त्याचबरोबरीने उन्हाळी हंगामासाठी टोमॅटो, ढोबळी मिरची, दुधी भोपळा, कलिंगड, काकडी, कारली, खरबूज, कांदा, भेंडी, दोडका, गवार आणि मिरची इ. भाजीपाला पिकांची लागवड सुरू आहे.
कमी पाणी असलेल्या भागात आच्छादनाचा वापर करावा. उष्णता आणि कोरड्या हवामानाला सहन करणारी वाण निवडावेत.
तापमान ३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गेल्यास भाजीपाला पिकांची फूलगळ होते. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला पिकांची लागवड करताना योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.
कमी पाण्यात तग धरणारी वाण निवडावीत. जलद वाढणाऱ्या आणि कमी कालावधीत उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड करावी.
कमी पाण्यावर येणाऱ्या भाजीपाला पिकांची निवड करावी. पीक फेरपालट करून जमिनीतील आर्द्रता टिकवावी, सुपीकता वाढवावी.
पाणी देण्याचे नियोजन करताना जमिनीचा प्रकार, पिकाची वाढ, वाणाचा प्रकार यांचा विचार करून ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा.
अधिक उत्पादन देण्याची क्षमता असणाऱ्या वाणाची लागवड करावी. स्थानिक बाजारात चांगला दर मिळणाऱ्या वाणांची निवड करावी.